कोलंबो - फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. श्रीलंका संघाने तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना 7 गडी राखून जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली. श्रीलंकेच्या विजयात वानिंदु हसरंगाने 4 गडी बाद करत मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्याने फलंदाजीत नाबाद 14 धावांचे योगदान दिले.
भारताने 82 धावांचे माफक लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले होते. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर धनंजया डिसिल्व्हा आणि हसरंगा यांनी चौथ्या गड्यासाठी 26 धावांची भागिदारी करत श्रीलंकेला 14.3 षटकांत विजय मिळवून दिला. फिरकीपटू राहुल चहरने भारताकडून तीन बळी मिळवले.
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. तेव्हा कर्णधार शिखर धवन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. या धक्क्यातून भारतीय संघ अखेरपर्यंत सावरूच शकला नाही. हसरंगाने ऋतुराज गायकवाड (14), संजू सॅमसन (0), भुवनेश्वर कुमार (16) आणि वरुण चक्रवर्ती (0) यांना बाद केलं. कुलदीप यादव 23 धावांवर नाबाद राहिला. भारताला 20 षटकांत 81 धावांपर्यंत मजल मारता आली.
हेही वाचा - IND VS SL : भारतीय क्रिकेटर कृणाल पांड्याला कोरोनाची लागण
हेही वाचा - Ind vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कातील 'त्या' 8 जणांचे रिपोर्ट आले