दुबई - टी-20 विश्वचषकाच्या 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघामध्ये महामुकाबला झाला. यात भारताने दिलेले धावसंख्येचे लक्ष्य पाकिस्तानच्या संघाने सहज पार केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळावर 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या होत्या. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने सहजरित्या पूर्ण केले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या संघाने एकही बळी न गमावता भारताने दिलेले आव्हान 17.5 षटकांत पूर्ण केले. पाकिस्तानकडून खेळताना मोहम्मद रिझवानच्या नाबाद 79 तर कर्णधार बाबर आझमने 68 धावा केल्या.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडले. टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळावर 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या. रविद्र जडेजाने 13 चेंडूत 13 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 11 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत भुवनेश्वर कुमारने 5 धावा काढून संघाची धावसंख्या दीडशेच्यावर पोहोचवली.
शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात रोहित शर्माला शुन्यावर बाद करून पाकिस्तानला शानदार सुरुवात केली. आफ्रिदीने पुढच्याच षटकात केएल राहुल (3) ला बाद करत भारताला जोरदार धक्का दिला. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार मारल्यानंतर टीम इंडियाला 18 चेंडूंनंतर पहिला चौकार मिळाला. तिसऱ्या विकेटसाठी कोहली आणि सूर्यकुमार यादवने डाव सांभाळण्यासाठी 21 चेंडूत 25 धावा जोडल्या. मात्र, नंतर हसन अलीने सूर्याला (11) बाद करून भारताची कंबर मोडली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 3 तर हसन अलीने 2 बळी घेतले. शादाब खान व रौफ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण 12 वेळा टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. भारत आजच्या सामन्यात विजयाची परंपरा कायम ठेवेल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, या सामन्यात पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला.