केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. कारण दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी याबाबतचे संकेत दिले होते. आता डिव्हिलियर्सच्या क्रिकेट पुनरागमनाविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने देखील या संदर्भात विचार सुरू केला होता. डिव्हिलियर्सच्या नावाचा विचार २०२१ च्या टी-२० विश्वकरंडकासाठी करण्यात येत होता. अशीच चर्चा २०१९ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेदरम्यानही झाली होती. आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले आहे. त्यामुळे एबी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला आता कायमचा पूर्ण विराम लागला आहे. दरम्यान, एबी डिव्हिलियल्सने १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तीन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच त्याने आफ्रिकेच्या तीनही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्वही केले आहे.
एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द -
डिव्हिलियर्सने आफ्रिकेकडून ११४ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याने २२ शतके आणि ४६ अर्धशतकासह ८ हजार ७६५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५०.६६ अशी आहे. २२८ एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर २५ शतके व ५३ अर्धशतकांसह ९ हजार ५७७ धावा आहेत. तर ७८ टी-२० सामन्यात १ हजार ६७२ धावा त्याने केल्या आहेत.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा; स्टँडची अशी झाली अवस्था, पाहा फोटो
हेही वाचा - कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरण: सुशील कुमारची याचिका न्यायालयाने फेटाळली