साउथम्पटन - न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १३९ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. भारताचे हे आव्हान न्यूझीलंडने केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. न्यूझीलंडच्या विजयात कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी महत्वाची भूमिका निभावली.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सावध सुरूवात केली. पण, अश्विनने लॅथम (९) आणि डेवोन कॉनवेला (१९) बाद करत सामन्यात चुरस निर्माण केली. न्यूझीलंडची अवस्था २ बाद ४४ अशी झालेली असताना, कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी मैदानात नांगर टाकला. दोघांनी भारतीय गोलंदाजांचे आक्रमण मोडून काढले. एकेरी दुहेरी धाव घेत त्यांनी धावगती राखली. एकेरी दुहेरी धाव घेत त्यांनी धावगती राखली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद ९९ धावांची भागिदारी केली. यात विल्यमसनने ८९ चेंडूंचा सामान करत ८ चौकारांसह ५२ धावांचे योगदान दिले. तर रॉस टेलरने १०० चेंडूंचा सामान करत ६ चौकारांसह ४७ धावा केल्या.
तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव १७० धावांवर आटोपला. पाचव्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ बाद ६४ धावा केल्या होत्या. सहाव्या दिवशी भारताने ६४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. तेव्हा उपाहारापर्यंत भारताचा अवस्था ५ बाद १३० अशी झाली. काइल जेमिसनने विराट कोहली (१३), चेतेश्वर पुजारा (१५) यांना बाद केले. तर अजिंक्य रहाणेला (१५) बोल्टने माघारी धाडले. उपहारानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारतीय संघाची मदार होती. परंतु, नील वॅग्नरने रवींद्र जडेजाला तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने १६ धावा केल्या. त्याचा झेल वॉटलिंगने घेतला. ७०व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात पंतने विकेट फेकली. बोल्टच्या गोलंदाजीवर निकोलसने त्याचा झेल टिपला. त्याने वैयक्तिक ४१ धावा केल्या. पंतनंतर बोल्टने अश्विनला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने ७ धावा केल्या. यानंतर शमी (१३) आणि बुमराह (०) यांनी मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने सर्वाधिक ४ बळी घेतले. बोल्टने ३, जेमिसनने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.
पहिला डाव (भारत) – सर्वबाद २१७ धावा (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९, काईल जेमीसन ५/३१)
पहिला डाव (न्यूझीलंड) – सर्वबाद २४९ धावा (डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यमसन ४९, मोहम्मद शमी ४/७६)
दुसरा डाव (भारत) – सर्वबाद १७० धावा (ऋषभ पंत ४१, टिम साऊदी ४/४८)
न्यूझीलंड दुसरा डाव – २ बाद १४० धावा (केन विल्यमसन नाबाद ५२ , रॉस टेलर नाबाद ४७ अश्विन २/१७)