मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंग आणि आई देविका देवी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोघांनाही रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धोनीचे आई-वडील यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या आई-वडीलांची प्रकृती स्थिर आहे. दोघांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई-वडील बरे होतील, अशा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यतीत करत आहे. गेल्या आयपीएलपासून चार महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव शिबिरात सामील झाला होता. त्यानंतर आयपीएल स्पर्धेच्या बायो बबलच्या नियमांचे धोनी पालन करत आहे. त्यामुळे कुटुंबियांशी तो संपर्कात आलेला नाही.
हेही वाचा - मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा, विराट कोहलीचे आवाहन
हेही वाचा - महाराष्ट्राच्या लेकीने ८०९१ मीटर उंच अन्नपूर्णा शिखर केले सर, ठरली पहिली भारतीय महिला