नवी दिल्ली MS Dhoni Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला रामलला अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहेत. राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात देश - विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येतंय. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांना आमंत्रित करण्यात आलंय.
महेंद्रसिंह धोनीला आमंत्रण : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीलाही आमंत्रित करण्यात आलंय. आजकाल धोनी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडताना दिसतो. अलीकडेच तो त्याच्या स्टायलिश लूकसाठीही व्हायरल झाला होता. आता तो या कार्यक्रमात सहभागी होतो की नाही हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचं असेल.
सचिन तेंडुलकरलाही बोलावलं : महेंद्रसिंह धोनी हा काही एकमेव क्रिकेटपटू नाही, ज्याला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आलंय. या आधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या क्रिकेटपटूंसोबतच माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि विराट कोहलीलाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलंय. धोनीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त राज्य सचिव धनंजय सिंह यांनी आमंत्रित केलं. मात्र, धोनी, सचिन, विराट आणि हरभजन या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आठ हजारांहून अधिक लोक सहभागी होणार : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सध्या जोरात सुरू आहे. या कार्यक्रमात आठ हजारांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकारनं सुरक्षेची तगडी व्यवस्था केली आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर, हे माझं भाग्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितलं. गेल्या आठवड्यात त्यांनी 11 दिवसांचा विशेष उपवास सुरू केला आहे.
हे वाचलंत का :