मँचेस्टर - इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला आहे. तो इंग्लंडविरुद्ध 10 सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना किरकोळ दुखापतीमुळे ओवल कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात भारतीय संघाने 157 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीने बुधवारी संघाच्या सराव सत्रात भाग घेतला.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मोहम्मद शमी फिट आहे. त्याने संघासोबत सराव केला.
दरम्यान, मोहम्मद शमीच्या रूपाने विराट कोहली आणि प्रशिक्षक विक्रम राठोडला पाचव्या कसोटी सामन्यासाठी एक पर्याय मिळाला आहे.
सलामीवीर रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा अद्याप संघाच्या मेडिकल टीमच्या निगराणीत आहेत. रोहित शर्माचा ओवल कसोटीत गुडघा दुखावला होता. तर याच कसोटीत पुजाराच्या पायाला दुखापत झाली.
रोहित दुखापतीतून सावरत असून तो पाचव्या कसोटी सामन्यात खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. पण यासाठी मेडिकल टीमकडून हिरवा झेंडा मिळावा लागेल. जर रोहित फिट झाला नाही तर त्याच्या जागेवर मयांक अग्रवाल, अभिमन्यू ईश्वरन किंवा पृथ्वी शॉ याला संधी मिळू शकते.
दुसरीकडे चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत हनुमा विहारी किंवा सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान मिळू शकतं.
हेही वाचा - गाठ तुटली! शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा लग्नाच्या 8 वर्षानंतर घटस्फोट
हेही वाचा - Ind VS Eng : भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज - मार्क वूड