नवी दिल्ली - चेन्नई येथे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी मिनी लिलाव घेण्यात आला. या लिलावात सर्व फ्रेंचायझींनी एकूण १४५ कोटी ३० लाख रुपयांची बोली लावत खेळाडूंना संघात घेतले. सर्वांना उत्सुकता असलेल्या या लिलावप्रक्रियेतून अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. काही दिग्गज खेळाडूंना अनपेक्षितपणे कमी रक्कम मिळाली. तर, काही खेळाडूंना विक्रमी बोली लागली. नजर टाकुया अशा खेळाडूंवर...
स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा आयपीएल लिलावामध्ये 'प्रमुख' मानला जात होता. त्याची बेस प्राईज २ कोटी होती. सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिली बोली लावली आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने स्मिथला २ कोटी २० लाखांत संघात घेतले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, दिल्लीकडे फलंदाजांची कमतरता नाही. अशा परिस्थितीत आता दिल्ली त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठे संधी देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कृष्णप्पा गौतम
यादीतील दुसरे नाव अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमचे आहे. गौतमवर चेन्नई सुपर किंग्जकडून ९.२५ कोटी रुपयांची मोठी बोली लावण्यात आली. त्याची बेस प्राईज २० लाख रुपये होती आणि कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी चेन्नईने ही बोली जिंकली. रवींद्र जडेजा संघात असल्याने गौतमवर विक्रमी बोली लावल्यामुळे चेन्नईच्या बाबती आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रिले मेरेडिथ
त्या यादीतील तिसरे नाव ऑस्ट्रेलियाचे रिले मेरेडिथचे आहे. रिले मेरीडिथ वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला पंजाब किंग्जकडून ८ कोटी रुपयांच्या बोलीसह सामील करण्यात आले. रिलेला भारतीय खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव नाही. परंतु तरीही पंजाबने त्याच्यावर इतका पैसा खर्च केला. रिलेने आतापर्यंत केवळ ३४ टी-२० सामने खेळले आहेत.
मुजीब उर रहमान
या यादीत चौथे नाव अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानचे आहे. मुजीबला सनरायझर्स हैदराबादने १.५० कोटींची बोली लावून विकत घेतले. या संघात राशिद खान आणि मोहम्मद नबी हे फिरकी गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत संघात मुजीबला घेणे आश्चर्य ठरले.
काइल जेमिसन
या यादीतील शेवटचे नाव न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनचे आहे. ७५ लाखांच्या बेस प्राइस असलेल्या जेमिसनला बंगळुरूने १५ कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. २६ वर्षीय जेमिसनला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. शिवाय, तो जास्त टी-२० सामने खेळलेला नाही. अलीकडच्या काळातही त्याला कसोटी स्वरूपामध्येच अधिक लोकप्रियता मिळाली आहे आणि त्याला भारतीय भूमीवर खेळण्याचा अनुभवही नाही.