अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा ३५वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला 55 धावांनी पराभवाची धूळ चारली. यासह गुणतालिकेत गुजरात संघ दुसऱ्या तर मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विजयानंतर लीगमध्ये 10 गुण मिळवणारा गुजरात हा दुसरा संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 6 गडी गमावून 207 धावांची मोठी धावसंख्या उभारली. शुभमन गिलने 34 चेंडूत 56 धावा, डेव्हिड मिलरने 22 चेंडूत 46 धावा, अभिनव मनोहरने 21 चेंडूत 42 धावा करून धावांचा डोंगर उभा केला. तर राहुल तेवतियाने 5 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी मुंबई इंडियन्सला 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 9 गडी गमावत 152 धावा करता आल्या.
मुंबईच्या फलंदाजांना गुजरातच्या संघाने दिलेले लक्ष्य पूर्ण करताना पुरती दमछाक झाली. दडपण असताना मुंबईच्या विकेट पटापट पडत गेल्याने आपोआप गुजरातचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. रोहित शर्माचा निम्मा संघ फक्त 59 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या नेहल वढेराने पराभव टाळण्यासाठी 21 चेंडूत 40 धावांची खेळी केली. कॅमेरून ग्रीनने 26 चेंडूत 33, सूर्यकुमार यादवने 12 चेंडूत 23 धावा केल्या. मुंबईविरुद्ध नूर अहमदने 3, रशीद खान आणि मोहित शर्माने 2-2, कर्णधार हार्दिक पंड्याने 1 बळी घेतला. त्याचवेळी गुजरात टायटन्सविरुद्ध पियुष चावलाने 2, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेयने 1-1 बळी घेतले.
गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा ; बदली खेळाडू - जोशुआ लिटल, दासुन शनाका, शिवम मावी, आर. साई किशोर, एस. भरत
मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ ; बदली खेळाडू - रमणदीप सिंग, तिलक वर्मा, शम्स मुलानी, विष्णू विनोद, संदीप वॉरियर
रोहित शर्मा : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्ही काल खेळपट्टी पाहिली, ती कठीण होती. आम्ही परिस्थितीचा सर्वोत्तम वापर करू इच्छितो. पंजाबविरुद्ध आम्ही काही चुका केल्या आणि आम्ही चेंजिंग रूममध्ये ते मान्य केले. तुम्ही त्या परिस्थितीतून कसे परत आलात आणि पुढील काही मॅचेससाठी तुम्ही काय योजना करणार आहात हे महत्त्वाचे आहे. आम्ही यावर चर्चा केली आहे आणि आशा आहे की आम्ही गोष्टी बदलू शकू. आमच्या टीममध्ये 2 बदल झाले आहेत. हृतिक शौकीनच्या जागी कुमार कार्तिकेय खेळणार आहे. जोफ्रा आर्चर अजूनही बरा झालेला नाही. रिले मेरेडिथ संघात परतला आहे.
हार्दिक पंड्या : ही खेळपट्टी चांगली दिसते आहे. आम्ही लखनौविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चांगली झुंज दिली होती. आम्ही ज्या प्रकारे सामन्यात कमबॅक केला त्याचे श्रेय मी माझ्या प्लेअर्सला देतो. आम्ही कधीही हार मानत नाही ते आम्ही दाखवून दिले. विशेष म्हणहे नशीबही आमच्या बाजूने होते. आम्ही तीच टीम खेळवत आहोत, फक्त जोश लिटलची संघात वापसी होत आहे.
हेही वाचा : IPL 2023 : विजयानंतरही दिल्ली कॅपिटल्सला बसला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नरला या चुकीसाठी भरावा लागणार दंड