मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा मुकाबला चेन्नई सुपर किंग्जशी झाला. मुंबईने दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा चेन्नईने यशस्वी पाठलाग केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने मुंबईवर 7 विकेटने विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने या सिझनमधील आपले पहिले अर्धशतक ठोकले. त्याला ऋतुराज गायकवाडने उत्तम साथ दिली.
अजिंक्य रहाणेचे दमदार अर्धशतक : चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने दमदार फलंदाजी करत चेन्नईच्या विजयाचा मार्ग सोपा केला. त्याने केवळ 27 चेंडूत शानदार 61 धावा केल्या. त्याला पीयूष चावलाने सूर्यकुमारच्या हातून झेलबाद केले. डावखूरा फलंदाज शिवम दुबेनेही एका टोकाने चांगली फलंदाजी केली. त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या. त्याला कुमार कार्तिकेयाने बोल्ड केले. ऋतुराज गायकवाड (40) आणि अंबाती रायुडू (20) शेवटपर्यंत नाबाद राहिले.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. चेन्नई सुपर किंग्जच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सचे फलंदाजी ढेपाळली. मुंबईला 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 157 धावा करता आल्या. धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यातही अपयशी ठरला. मुंबईकडून ईशान किशनने सर्वाधिक 21 चेंडूत 32 धावा केल्या. त्याला टिम डेव्हिडने (22 चेंडूत 31 धावा) साथ दिली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3, तर तुषार देशपांडे आणि मिशेल सॅंटनरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 : चेन्नई सुपर किंग्ज - डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिशेल सॅंटनर, सिसांदा मगेला, तुषार देशपांडे ; मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, त्रिस्तन स्टब्ज, अर्शद खान, हृतिक शौकिन, पीयुष चावला, जॅसन बेहनडॉर्फ
हे ही वाचा : IPL 2023 : राजस्थानचा दिल्लीवर मोठा विजय, बोल्ट-चहलची घातक गोलंदाजी