मोहाली : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहाली स्टेडियमवर खेळला गेला. या वर्षी पंजाब किंग्जची कमान डॅशिंग फलंदाज शिखर धवनच्या हाती आहे. केकेआर विरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर शिखर धवन म्हणाला की, आमच्या संघाला आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकायचे आहे. संघात असे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये संघाला या हंगामाचा चॅम्पियन बनवण्याची क्षमता आहे. मात्र असे दिसून आले आहे की, जेव्हा शिखर धवनवर कर्णधारपदाचा अतिरिक्त भार पडतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर पडला आहे.
कर्णधार म्हणून एकही अर्धशतक नाही : शिखर धवन हा एक धडाकेबाज सलामीवीर फलंदाज आहे. तो त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण आकडेवारी सांगते की शिखर धवन आयपीएलमध्ये कर्णधार असताना त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर दिसून येतो. शिखर धवनने आत्तापर्यंत आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून एकही अर्धशतक झळकावलेले नाही. शनिवारी केकेआर विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यातही तो अर्धशतक झळकावण्यापासून वंचित राहिला. अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहचल्यावर केकेआरचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याला 40 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू : आयपीएलमध्ये डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनची बॅट खूप तळपली आहे. शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली नंतर दुसऱ्या स्थानी आहे. शिखर धवनने आयपीएलच्या 207 सामन्यांच्या 206 डावांमध्ये फलंदाजी करताना 35.10 च्या सरासरीने 6284 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 2 आयपीएल शतके देखील आहेत. धवनची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 106 आहे. काल पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे 7 धावांनी मात करत आयपीएल 2023 ची विजयी सुरुवात केली. मोहालीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात पावसामुळे दोनदा व्यत्यय आला होता.
हे ही वाचा : IPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 50 धावांनी मोठा विजय, मार्क वुडने 5 विकेट घेतल्या