लखनौ : लखनौ सुपरजायंट्सने जखमी के. एल. राहुलच्या जागी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरचा आपल्या संघात समावेश केला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने राहुल आयपीएल 2023 च्या हंगामातून बाहेर झाला आहे. आयपीएलमध्ये अनेक फ्रँचायझींकडून खेळण्याचा अनुभव असलेल्या करुणच्या स्पर्धेत 1496 धावा आहेत. तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाज असलेल्या करुणने कसोट सामन्यात त्रिशतक झळकावले आहे.
करुणचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड : करुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुमारे 50 च्या सरासरीने जवळपास 6000 धावा केल्या आहेत. त्याच्या या प्रदर्शनाने प्रभावित होऊन लखनऊ सुपरजायंट्सने त्याला आपल्या संघात सामील केले आहे. या सीझनसाठी लखनौमध्ये सामील होण्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'सुपर जायंट्समध्ये सामील होऊन मला खरोखरच आनंद झाला. के.एल. लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आशा आहे की तो आणखी मजबूतीने पुनरागमन करेल. मी माझ्या सहकाऱ्यांना लवकरच भेटण्यासाठी आणि संघासाठी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.'
त्रिशतक झळकावल्यानंतरही टीम इंडियात संधी नाही : लखनौ सध्या 5 विजय, 1 अनिर्णित आणि 4 पराभवांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. करुण संघात आल्याने ते येत्या काही आठवड्यांत त्यांचे प्लेऑफ मधील स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. त्रिशतक झळकावल्यानंतर करुण नायर रातोरात क्रिकेट स्टार बनला होता. मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघात नियमित स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज हेऊन त्याने ट्विटरवर एकदा, 'प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे', असे लिहिले होते. अखेर लखनऊ सुपरजायंट्सने करुण नायरला पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी दिली आहे.