अहमदाबाद : गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिल सध्या त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मोसमात त्याने 4 शतक व 3 अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. आजच्या सामन्यात देखील तो अनेक विक्रमांना गवसणी घालू शकतो.
विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडू शकतो : आयपीएलच्या या मोसमात शुभमनने 16 डावांमध्ये 60.79 ची सरासरी आणि 156.43 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 851 धावा केल्या आहेत. यासह तो आयपीएलच्या एका मोसमात 800 पेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहलीनंतर केवळ दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. आयपीयएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने 2016 मध्ये 4 शतकांच्या मदतीने 973 धावा केल्या होत्या. आज शुभमनला कोहलीचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला आणखी 123 धावांची आवश्यकता आहे.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
फलंदाज | टीम | धावा | सामने | वर्ष |
विराट कोहली | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू | 973 | 16 | 2016 |
जोस बटलर | राजस्थान रॉयल्स | 863 | 17 | 2022 |
शुभमन गिल | गुजरात टायटन्स | 851* | 16 | 2023 |
डेव्हिड वॉर्नर | सनरायझर्स हैदराबाद | 848 | 17 | 2016 |
900 धावा करणारा दुसरा खेळाडू : विराट कोहलीशिवाय आत्तापर्यंत कोणताच खेळाडू आयपीएलच्या एका मोसमात 900 पेक्षा अधिक धावा करू शकलेला नाही. गिलने आज 49 धावा करताच तो 900 धावा करणारा केवळ दुसरा फलंदाज ठरेल. विराट कोहलीनंतर आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. त्याने 2022 मध्ये 17 सामन्यात 863 धावा केल्या होत्या. बटलरचा हा विक्रम मोडण्यासाठी गिलला फक्त 13 धावांची आवश्यकता आहे.
एका मोसमात सर्वाधिक शतके : शुभमन गिलने या मोसमात सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध शतके ठोकली आहेत. एका मोसमात सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 2016 मध्ये 4 शतके ठोकली होती. आजच्या सामन्यात शतक करून गिल कोहलीच्या या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
हेही वाचा :