दुबई - आयपीएल २०२१चा ४९वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला. सलामीवीर शुबमन गिलचे अर्धशतक आणि नितीश राणाची उपयुक्त खेळी कोलकाताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. या विजयासह कोलकाताने प्लेऑफच्या दृष्टीने मजबूत पाऊल टाकत गुणतालिकेत १२ गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे.
Kolkata Knight Ridersच्या नियोजनबद्ध गोलंदाजीसमोर सनरायझर्स हैदरबाद संघाला 115 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादने नाणेफेक जिंकून 20 षटकात 8 बाद 115 धावा केल्या आणि कोलकाताला विजयासाठी 116 धावांचे आव्हान मिळाले. केन विल्यमसन (26) आणि अब्दुल समद (26), जेसन रॉय वगळता एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कोलकाताकडून साऊथी, मावी आणि चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अंगलट आला. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टिम साउथीने वृद्धीमान साहाला शून्यावर माघारी पाठवलं. चौथ्या षटकात शिवम मावीने जेसन रॉयची (10) विकेट घेतली. त्याचा झेल साऊथीने घेतला. संघाची धावसंख्या 38 असताना केन विल्यमसनच्या रुपाने हैदराबादला मोठा धक्का बसला. शाकिबने विल्यमसनला धावबाद केले.
अभिषेक शर्मा आणि प्रियम गर्ग जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण शाकिबच्या चेंडूवर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक स्टम्पिंग झाला. त्याने 6 धावांचे योगदान दिले. गर्ग आणि अब्दुल समदने कोलकाताच्या फिरकी माऱ्यावर एकेरी दुहेरी धाव घेतली. वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात गर्ग बाद झाला. त्याने 21 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने त्याचा झेल सीमारेषेवर टिपला. अशीच चूक जेसन होल्डरने केली. तो देखील चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण समदने चक्रवर्तीच्या षटकात सलग दोन षटकार खेचले.
डेथ ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात समद सीमारेषेजवळ गिलकडे झेल देऊन बसला. त्याला साउथीने माघारी धाडले. समदने 18 चेंडूत तीन षटकारांसह 25 धावा केल्या. अखेरीस हैदराबादला 115 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून साऊथी, मावी आणि चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. साकिबला एक विकेट मिळाली.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद – जेसन रॉय, वृद्धीमान साहा, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि सिद्धार्थ कौल.
कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरिन, शाकिब अल हसन, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी.