दुबई - आयपीएलच्या दुसऱ्या सत्रामध्ये आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये चांगल्या फलंदाजांचा भरणा असून दोन्ही संघाला आजचा सामना जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानी येण्याची संधी आहे. दरम्यान, लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स हा गुणतालिकेत सहाव्या स्थानावर, तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघाकडे मजबूत फलंदाज असल्याने हा सामन रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे एविन लुईस आणि लियाम लिव्हिंगस्टोनची दमदार फलंदाजी तर दुसरीकडे ख्रिस गेलची ताकद आणि कर्णधार केएल राहुलची रणनिती दर्शकांना बघायला मिळणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर खेळत नसल्याने त्यांना बटलरची कमी जाणवणार आहे. तर लुईसचे संघात आगमन झाल्याने संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे. तर अष्टपैलू ख्रिस मॉरिसही या सामन्यात प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. या आयपीएल हंगामात त्याने सर्वाधिक 14 विकेट घेत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पंजाबकडून ख्रिस गेलसह राहुल किंवा मयांक अग्रवाल सलामीला येण्याची शक्यता आहे. गेलचा पंजाबसाठी हा 40 वा सामना असणार आहे. झी रिचर्डसन आणि रिले मेरीडिथ यांनी आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने पंजाबची गोलंदाजी कमजोर पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 22 सामने झाले असून राजस्थानने 12 तर पंजाबने 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
असे असतील संघ -
पंजाब किंग्ज - केएल राहुल (c, wk), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, फॅबियन एलन/आदिल रशीद, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, मोहम्मद शमी
राजस्थान रॉयल्स - एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c, wk), लियाम लिव्हिंगस्टोन, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, राहुल तेवाटिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकरिया/जयदेव उनाडकट
हेही वाचा - भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा