चेन्नई - इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी १८ फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताचा एस. श्रीशांत यांनी या प्रक्रियेसाठी आपली नोंदणी केली आहे.
हेही वाचा - आयपीएल लिलाव : १०९७ क्रिकेटपटू आजमवणार नशीब
२०१५मध्ये आयपीएलमध्ये अखेरचा खेळलेला स्टार्क आता स्पर्धेत पुन्हा दिसणार नाही. तर, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतकी खेळी करणारा रूटही सलग दुसऱ्यांदा आयपीएलबाहेर राहिला आहे. इंग्लंडच्या हॅरी गुर्नी आणि टॉम बँटन यांनीही स्पर्धेबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिबची सर्वात जास्त मूळ किंमत 2 कोटी रूपये नोंदविण्यात आली आहे. तर, सात वर्षांच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रीशांतची या लिलावासाठी बेस प्राईज ७५ लाख एवढी असणार आहे. हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, लियाम प्लंकेट आणि कॉलिन इनग्राम यांचा दोन कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह समावेश करण्यात आला आहे.
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचाही या लिलावात समावेश आहे. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे. लिलाव प्रक्रियेला दुपारी ३ वाजता प्रारंभ होईल. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते.