चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे पडघम वाजले आहेत. या स्पर्धेसाठीची लिलावप्रक्रिया १८ फेब्रुवारी होईल. या लिलावासाठी एकूण १०९७ खेळाडू आपले नशीब आजमवणार आहेत. यात २०७ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या नव्या पर्वासाठी खेळाडूंच्या नोंदणीची अंतिम तारीख गुरुवारी (४ फेब्रुवारी) संपली.
हेही वाचा - खास सामन्यात रूटचे शतक आणि हॅट्ट्रिक!
आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये भारतासाठी खेळलेल्या २१ क्रिकेटपटूंचाही या लिलावात सहभाग असणार आहे. तर, सहयोगी देशांतील २७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याखेरीज ८६३ असे खेळाडू आहेत, ज्यांनी अद्याप आपल्या देशातील वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले नाही. यात ७४३ भारतीय आणि ६८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
ज्या भारतीय खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले नाही, परंतु किमान एक आयपीएल सामना खेळला आहे, अशा ५० खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. या यादीत दोन विदेशी खेळाडूंचादेखील समावेश आहे. आयपीएलने शुक्रवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक फ्रेंचायझीने आपल्या संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवले, तर लिलावात ६१ खेळाडू खरेदी केले जातील (त्यातील २२ विदेशी खेळाडू असू शकतात).
कोणत्या संघाकडे किती रक्कम?
दुपारी तीन वाजता लिलाव सुरू होईल. किंग्ज इलेव्हन पंजाब सर्वाधिक ५३.२० कोटी रुपयांच्या रकमेसहसह लिलावात प्रवेश करेल. त्याखालोखाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (३५.९० कोटी), राजस्थान रॉयल्स ३४.८५ कोटी), चेन्नई सुपर किंग्ज (२२.९० कोटी), मुंबई इंडियन्स (१५.३५ कोटी), दिल्ली कॅपिटल्स (१२.९ कोटी) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबाद (दोन्ही १०.७५ कोटी) असे संघ आहेत.
रिलिज आणि रिटेनची गोष्ट -
यंदाच्या पर्वासाठी आठ संघांनी मिळून एकूण १३९ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर एकूण ५७ खेळाडूंना मुक्त केले आहे. आयपीएल संघांकडून रिलिज झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
नोंदणी केलेल्या २८३ विदेशी खेळाडूंची संख्या खालीलप्रमाणे -
अफगाणिस्तान (३०), ऑस्ट्रेलिया (४२), बांगलादेश (५), इंग्लंड (२१), आयर्लंड (२), नेपाळ (८), नेदरलँड (१), न्यू न्यूझीलंड (२९), स्कॉटलंड (७), दक्षिण आफ्रिका (३८), श्रीलंका (३१), यूएई (९), अमेरिका (२), वेस्ट इंडिज (५६) आणि झिम्बाब्वे (२).