चेन्नई - सनरायजर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्जचा ९ गडी राखून पराभव करत आयपीएल २०२१ मध्ये विजयाचे खाते उघडले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादपुढे विजयासाठी १२१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. हे आव्हान हैदराबादने १ गड्याच्या मोबदल्यात ८ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले. हैदराबादचा तीन पराभवानंतर हा पहिला विजय आहे. तर दुसरीकडे पंजाबचा हा सलग तिसरा पराभव आहे.
पंजाबच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने १०.१ षटकात ७३ धावांची सलामी दिली. फॅबिएन एलेनने वॉर्नरला बाद करत पंजाबला एकमात्र यश मिळवून दिले. वॉर्नरने ३७ चेंडूत ३७ धावा केल्या. यात ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. वॉर्नर बाद झाल्यानंतर जॉनी बेयरस्टोने केन विल्यमनसच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जॉनी बेयरस्टोने नाबाद ६३ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ३ षटकाराचा समावेश आहे. तर केन विल्यमसन १६ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांची सुरूवात खराब झाली. फॉर्मात असलेल्या राहुल ४ धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला केदार जाधवकरवी झेलबाद केले. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि ख्रिस गेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पॉवर प्लेमध्ये ३२ धावा फलकावर लावल्या. पॉवर प्लेच्या संपल्यानंतर पुढील षटकात अग्रवाल बाद झाला. खलील अहमदने अग्रवालला (२२) बाद केले. अग्रवालचा अप्रतिम झेल राशिद खानने टिपला. यानंतर निकोलस पूरन धावबाद होऊन आल्या पाऊले माघारी परतला. राशिद खानने ९व्या षटकात ख्रिस गेलला (४७) पायचित करत पंजाबला मोठा धक्का दिला.
दीपक हुडा स्थिरावल्याचे भासत असताना त्याला अभिषेक शर्माने पायचित केले. तेव्हा पंबाजची अवस्था ११.३ षटकात ६३ अशी झाली होती. यानंतर मोईजेस हेनरिक्स आणि शाहरूख खानने पंजाबचा किल्ला लढवला. पण अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या नादात हेनरिक्स बाद झाला. तेव्हा शाहरूखने फँबियन एलनला सोबत घेत पंजाबला शतकी टप्पा गाठून दिला.
खलील अहमदने एलनला (६) वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. डेथ ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात शाहरूख झेलबाद झाला. त्याने २२ धावा केल्या. अखेरीस पंजाबचा संघ १२० धावांवर ऑलआऊट झाला. हैदराबादकडून खलीलने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अभिषेक शर्मा २, राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - IPL २०२१ : कोलकात्यासमोर चेन्नईचे आव्हान, धोनी-मॉर्गन आमनेसामने
हेही वाचा - MI VS DC : 'मुंबई इंडियन्सच्या संघाने सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला, ही कौतूकास्पद बाब'