चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वामध्ये आज डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुणतालिकेत तळाशी असलेल्या दोन संघांमध्ये सामना होत आहे. पंजाब किंग्जला तीन सामन्यांमधून फक्त एकाच सामन्यामध्ये विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला तिन्ही सामन्यांमध्ये लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ चेन्नईत एकमेकांना भिडणार आहेत. याप्रसंगी पंजाब दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करील, तर हैदराबाद विजयाचे खाते उघडण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.
केएल राहुल व मयांक या सलामीवीरांनी चांगले प्रदर्शन केल्यानंतरही पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. ख्रिस गेल, निकोलस पूरण यांच्यासह दीपक हुडा व शाहरुख खान यांना मधल्या फळीत सातत्याने दमदार फलंदाजी करणे आवश्यक आहे. पंजाब किंग्जकडे मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन यांसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. तसेच अर्शदीप सिंग व रायली मेरेडीथ यासारखे युवा मध्यमगती गोलंदाज त्यांच्या दिमतीला आहेत. पण या सर्व गोलंदाजांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसून येत आहे. तसेच पाचव्या गोलंदाजाची कमतरताही यावेळी संघाला भासत आहे.
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. पहिल्या तीन सामन्यातील कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, राशिद खान व मुजीब उर रहमान या चौघांनी आपली छाप टाकली आहे, पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारतीय खेळाडूंना संघासाठी भरीव योगदान द्यावे लागणार आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि टी नटराजन यांना प्रभावी मारा करावा लागेल. राशिद खान आणि मुजीब उर रहमान आपली जबाबदारी चोख निभावत आहे.
- पंजाब किंग्जचा संघ -
- केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत बराड, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, इशान पोरेल, दर्शन नल्कंडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोइजेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलन आणि सौरभ कुमार.
- सनरायजर्स हैदराबादचा संघ -
- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, विराट सिंह, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धीमान साहा, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे सुचित, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासिल थम्पी, शाहबाज नदीम आणि मुजीब-उर-रहमान.
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल
हेही वाचा - MI VS DC : दिल्लीचा मुंबईवर ६ विकेट्स राखून विजय