मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. चेन्नईच्या संघाने मागील दोन सामन्यात सलग विजय मिळवले आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे कोलकाताच्या संघाला मागील दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. ते विजयी लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आजच्या सामन्यात कोलकाताचा संघ चेन्नईचे आव्हान परतवून लावत या स्पर्धेत झोकात पुनरागमन करतोय का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
नितीश राणा वगळता कोलकाताच्या कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत या स्पर्धेत आपला ठसा उमटवता आलेला नाही. शुबमन गिल, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक व राहुल त्रिपाठी यांना फलंदाजीत पुढाकार घेऊन संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत करावी लागणार आहे. गोलंदाजी विभागात प्रसिद्ध कृष्णा, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, आंद्रे रस्सेल यांना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवावं लागेल. अन्यथा या संघाचा पुढचा मार्ग खडतर ठरेल.
चेन्नई सुपर किंग्जने मागील दोन सामन्यामध्ये विजय मिळवला असला तरी अद्याप त्यांची फलंदाजी विभागाकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. फाफ डू प्लेसिस, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी यांना फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. गोलंदाजीत दीपक चहर, सॅम कुरेन यांनी प्रभावी मारा केला आहे. परंतु शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हो यांना अद्याप लय सापडलेली नाही. जडेजा आणि मोईन अली आपल्यापरीने मोलाचे योगदान देत आहेत.
दोन्ही संघ यातून निवडणार :
- कोलकाता नाईट रायडर्स : इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, आंद्रे रसेल, सुनील नारायण, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, पी. कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब-अल-हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग्ज, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.
- चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, के. एम. आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ- डू-प्लेसिस, इम्रान ताहिर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटेनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरेन, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भागनाथ वर्मा, सी. हरी निशांत.