शारजाह - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शारजाहच्या मैदानात रंगला आहे. केकेआरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 127 धावा केल्या आहेत. केकेआरकडून लॉकी फर्ग्यूसन, सुनिल नरेन आणि व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. केकेआरला विजयासाठी 128 धावा कराव्या लागणार आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सकडून स्टिव्ह स्मिथ आणि शिखर धवन ही जोडी सलामीला उतरली. या जोडीने दिल्लीला सावध सुरूवात करून दिली. लॉकी फर्ग्यूसन याने ही जोडी फोडली. त्याने धवनला व्यंकटेश अय्यरकडे झेल देण्यास भाग पाडले. धवनने 20 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावांची खेळी साकारली. यानंतर आलेला श्रेयर अय्यरला सुनिल नरेनने आपल्या फिरकी जाळ्यात अडकवले. नरेनने स्लोवर वन चेंडूवर अय्यर (1) क्लीन बोल्ड केले.
स्टिव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली होती. त्याला ऋषभ पंतने साथ दिली. दोघांनी सुरूवातील एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला. सेट झाल्यानंतर स्मिथने फटकेबाजीला सुरूवात केली. तेव्हा लॉकी फर्ग्यूसन केकेआरच्या मदतीला धावला. त्याने स्मिथला क्लीन बोल्ड केले. स्मिथने 34 चेंडूत 4 चौकारासह 39 धावांची खेळी केली. यानंतर आलेला शिमरोन हेटमायरचा (4) अडथळा व्यंकटेश अय्यरने दूर केला. उंचावून मारण्याच्या नादात उडालेला त्याचा झेल टिम साउथीने घेतला.
सुनिल नरेनने ललित यादवला (0) पायचित केल्याने दिल्लीची अवस्था 14.3 षटकात 5 बाद 89 अशी झाली. यानंतर व्यंकटेश अय्यरने अक्षर पटेलला (0) लॉकी फर्ग्यूसनकरवी झेलबाद केले. दिल्लीचे शतक 17व्या षटकात पूर्ण झाले. ऋषभ पंत अखेरच्या षटकात धावबाद झाला. त्याने 39 धावांचे योगदान दिले. अखेरीस दिल्लीला 127 धावांपर्यंत मजल मारता आली. केकेआरकडून लॉकी फर्ग्यूसन, सुनिल नरेन आणि व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर टिम साउथीने एक गडी बाद केला.
हेही वाचा - MI vs PBKS : मुंबई-पंजाब यांच्यात आज टॉप-4 साठी कडवी झुंज
हेही वाचा - पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका