मुंबई - आयपीएल 2021च्या उर्वरित हंगामाला पुढील महिन्यात यूएईमध्ये पुन्हा सुरूवात होणार आहे. याआधी संघात बदल आणि रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात येत आहे. यात कोलकाता नाइट रायडर्स यांनी देखील एक मोठा बदल केला आहे. दोन वेळचा चॅम्पियन संघ केकेआरने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथीला आपल्या संघात घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स वैयक्तिक कारणामुळे आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात खेळणार नाही. यामुळे केकेआरने पॅट कमिन्सच्या जागेवर टिम साउथीला रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून निवडलं आहे.
टिम साउथीने 305 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. यात त्याच्या नावे एकूण 603 विकेट आहेत. साउथी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 99 विकेटसह सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इतकेच नाही तर साउथी आयसीसी टी-20 गोलंदाजी रॅकिंगमध्ये सहाव्या स्थानी आहे.
केकेआरचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी सांगितलं की, 'टिम साउथी आमच्यासोबत जोडला गेल्याने आम्हाला आनंद आहे. तो एक मॅच विनर खेळाडू आहे. तो संघात आल्याने आमची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.'
दरम्यान, आयपीएल 2021च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. केकेआर या हंगामात 20 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्याने आपल्या अभियानाला सुरूवात करेल.
हेही वाचा - Ind Vs Eng : सिराजवर प्रेक्षकांनी चेंडू फेकून मारला?, ऋषभ पंतचा खुलासा
हेही वाचा - IND vs ENG: 39 वर्षीय जेम्स अँडरसन 'अशी' राखून ठेवतो आपली ऊर्जा