दुबई - आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग दुबईमध्ये दाखल झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने रिकी पाँटिंग यांचा फोटो ट्विट करत याची माहिती दिली.
दिल्ली कॅपिटल्स संघाने रिकी पाँटिंग यांचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी म्हटलं आहे की, बॉस आले आहेत. काय रिकी पाँटिंगच्या पहिल्या भाषणासाठी तुम्ही सर्वजण उत्साहित आहात का?
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग हे 2018 पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. दिल्लीचा पाँटिंगसोबतचा हा चौथा हंगाम आहे. त्यांच्या प्रशिक्षणात दिल्ली संघाने 2019 मध्ये तिसरे स्थान पटकावले होते. तर 2020 मध्ये दिल्लीचा संघ उपविजेता ठरला. तर 2018 मध्ये दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी होता.
रिकी पाँटिंगच्या आधी गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स हे बुधवारी यूएईमध्ये पोहोचले आहेत. त्याआधी सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ मंगळवारी दुबईत दाखल झाले आहेत. सराव सत्रात भाग घेण्याआधी तिन्ही प्रशिक्षक सहा दिवसांसाठी क्वारंटाईन राहतील.
दिल्ली कॅपिटल्स संघातील स्थानिक खेळाडू आणि इतर सपोर्ट स्टाफ आधीच यूएईमध्ये दाखल झाला आहे. त्यांचा क्वारंटाईन कालावधी 29 ऑगस्टर रोजी पूर्ण झाला. यानंतर खेळाडूंनी सरावाला सुरूवात केली.
श्रेयस अय्यरचा सराव
खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यर 14 ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचला. तो फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 सामन्यात 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. ते 22 सप्टेंबर रोजी उर्वरित हंगामातील आपल्या अभियानाला सुरूवात करतील. त्यांचा पहिला सामना दुबई येथील मैदानात सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरोधात होणार आहे.
हेही वाचा - India vs England: मँचेस्टर कसोटी होणार रद्द? सौरव गांगुलींचं सूचक विधान
हेही वाचा - T-20 World Cup: मार्गदर्शक बनल्यानंतर वादात अडकला महेंद्रसिंग धोनी, होतोय गंभीर आरोप