मुंबई - आयपीएलमध्ये सहभागी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक, सामना अधिकारी आणि समालोचक हे सुरक्षित मालदीवला पोहोचले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमध्ये काही दिवस राहणार आहेत.
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत भारतातून थेट येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. जोपर्यंत याबाबत काही तोडगा निघत नाही, तोपर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडू हे मालदीवमध्ये राहतील. दरम्यान, यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केलं आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन बीसीसीआयचे आभार मानते की, त्यांनी आयपीएल पुढे ढकलल्यानंतर जबाबदारीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतातून मालदीवला दोन दिवसाच्या आत पोहोचवले.'
ऑस्ट्रेलियाचे सगळे सहभागी खेळाडू जरी मालदीवला पोहोचले असले तरी, माईक हसी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो एकटा भारतात राहिला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज त्याची काळजी घेत आहे. माईक हसीला ऑस्ट्रेलियात सुखरुप परत आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन बीसीसीआयच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा - कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र
हेही वाचा - कॅप्टन असावा तर असा! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान