दुबई - मुंबई इंडियन्सचा संघ सध्या तुफान फॉर्मात असून त्यांची सांघिक कामगिरी चांगली होत आहे. मधल्या फळीत फलंदाजीला येत असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला गेला आहे. क्रिकेटमधील एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वीच त्याच्या नावावर आयपीएलचे १०० सामने खेळल्याची नोंद झाली आहे. सूर्यकुमारची कामगिरी गेल्या काही सामन्यांपासून सरस राहिली आहे.
२ हजारहून अधिक धावांचीही नोंद
संघाचा धावफलक सुस्थितीत आणण्यासाठी त्याने काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वीच त्याच्या नावावर आयपीएलमध्ये २ हजारहून अधिक धावांचीही नोंद झाली आहे. दिल्ली विरूद्धच्या क्वालिफायर सामन्यात ३८ चेंडूत ५१ धावा काढत त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. दिल्लीसमोर २०० धावांचे मोठे आव्हान उभारण्यात त्याने महत्वपूर्ण योगदान दिले. त्याने आत्तापर्यंत १६४ टी-२० सामने खेळले आहेत.