शारजाह - चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. डेथ ओव्हर्स गोलंदाजीचा बादशाह ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे दोन आठवठे संघाबाहेर जाऊ शकतो, असे संकेत संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेंमिंग यांनी दिले आहेत.
काल (शनिवारी) झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. मात्र, त्यावेळी ब्राव्हो गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे चेन्नईला सामना गमवावा लागला. शेवटचे षटक ब्राव्होला न दिल्याने कर्णधार धोनीला टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर धोनी आणि प्रशिक्षक फ्लेमिंग या दोघांनीही ब्राव्होच्या दुखापतीविषयी माहिती दिली.
ड्वेन ब्राव्होच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो शनिवारी गोलंदाजी करू शकला नाही. याचे त्यालाही वाईट वाटले आहे. मात्र, दुखापत असताना गोलंदाजी करणे जास्त धोकादायक ठरले असते. आता त्याची तपासणी केली जाणार असून कदाचित त्याला संघाबाहेरही जावे लागेल, असे स्टिफन फ्लेंमिंगने स्पष्ट केले.
आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्याअगोदरही ब्राव्हो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याला सुरुवातीचे दोन आठवडे खेळता आले नाही. त्यानंतर तो बरा होऊन संघात दाखल झाला होता. मात्र, आता पुन्हा त्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे. ब्राव्होच्या दुखापतीची चेन्नईच्या संघाला मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे. याची झलक दिल्ली विरुद्धच्या सामन्यात दिसली.
दरम्यान, स्टिफन फ्लेंमिंगने शिखर धवनच्या खेळाची स्तुती केली. धवन हा प्रचंड क्षमता असलेला खेळाडू आहे. त्याला आम्ही लवकर बाद करू शकलो असतो मात्र, त्याला पाचवेळा जीवदान मिळाल्याने त्याने आमचा विजय हिरावून नेला, असे फ्लेंमिंग म्हणाला.