मोहाली - किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव १५२ धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज सॅम करन याच्या हॅटट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्लीवर १४ धावांनी विजय मिळवला. ऋषभ पंत त्रिफळाचित झाल्यानंतर सामन्याचे चित्र पालटले आणि अवघ्या ८ धावांमध्ये दिल्लीच्या ६ विकेट्स पडल्या. सॅम कुरनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
आयपीएलच्या बाराव्या मोसमातील तेराव्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पंजाबच्या संघाने ख्रिस गेलच्या जागी सॅम करन याला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा प्रयोग केला होता. मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. तो १० चेंडूत २० धावा करून पायचीत झाला. पंजाबची ३ बाद ५८ अशी स्थिती असताना डेव्हिड मिलर आणि सरफराझ खान यांनी संघाला डाव सावरले. सरफराझने २९ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावा तर मिलरने ३० चेंडूंच ४३ धावांची खेळी साकारली. शेवटच्या षटकांमध्ये मनदीप सिंगने नाबाद २९ धावांची उपयुक्त खेळी केल्याने पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. निर्धारित २० षटकात पंजाबच्या ९ गडी बाद १६६ धावा केल्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवाक खराब राहिली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने पृथ्वी शॉला शून्यावर झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत दिल्लीला अर्धशतकी मजल मारून दिली. कॉलिन इन्ग्राम (२९ चेंडूत ३८ धावा) आणि रिषभ पंत (२९ चेंडूत ३९ धावा) यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला विजयासमीप पोहोचवले. कोलिनने पंतसोबत 62 धावांची भागिदारी केली. मात्र, पंत बाद झाल्यानंतर संघाचा डाव पत्यासारखा कोसळला. १४ चेंडूत ११ धावा देऊन ४ बळी टिपणाऱ्या सॅम करन सामनावीर ठरला.