राजकोट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. (India vs Sri Lanka 3rd T20 match). भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला आहे. (India beat Sri Lanka by 91 runs). कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 16.4 षटकात 10 गडी गमावून केवळ 137 धावाच करू शकला.
श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुशल मेंडिस आणि कर्णधार दासून शनाका यांनी 23-23 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. हार्दिक पांड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. अक्षर पटेलने एक विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी, टीम इंडियाने 20 षटकांत 5 विकेट गमावत 228 धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्याशिवाय शुभमन गिलने ४६ धावांची खेळी खेळली. दिलशान मदुशंकाने २ बळी घेतले. तर कसून रजिथा, चमिका करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय संघाने श्रीलंकेकडून सलग पाचवी मायदेशात मालिका जिंकली आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 6 मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी फक्त एकच अनिर्णित राहिली आहे, जी 2009 मध्ये खेळली गेली होती.
सूर्यकुमारचे शतक : सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सूर्यकुमारने गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली होती.
भारताचा डाव -
पाचवी विकेट : दीपक हुडाच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. 17व्या षटकात दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर दीपक हुडाला हसरंगाने लॉंगवर झेलबाद केले. हुडाने दोन चेंडूत चार धावा केल्या.
चौथी विकेट : कसून राजिताने हार्दिक पांड्याला धनंजया डी सिल्वाकरवी झेलबाद केले. 16व्या षटकातील 5व्या चेंडूवर तो बाद झाला.
तिसरी विकेट : हसरंगाने सामन्याच्या 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुभमन गिलला बोल्ड केले. गिलने 36 चेंडूत 46 धावा केल्या.
दुसरी विकेट : राहुल त्रिपाठीच्या रूपाने भारताला आणखी एक धक्का बसला. त्याचा सहाव्या षटकाच्या 5व्या चेंडूवर शॉर्ट थर्ड मॅनवर दिलशान मदुशंकाने झेल घेतला. त्याला चमिका करुणारत्नेने बाद केले. त्याने 16 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
पहिली विकेट : पहिल्याच षटकात मधुशंकाच्या चेंडूवर स्लिपवर उभा असलेला धनंजय डी सिल्वाकडे इशान किशनला झेलबाद केले. किशनने दोन चेंडूत एका धावेची खेळी केली.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :
भारतीय संघ : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
श्रीलंकेचा संघ : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चारिथ अस्लंका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिकशन, कसून राजिथा आणि दिलशान मदुशंका.