मँचेस्टर/कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचे जूनियर फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उद्या शुक्रवारपासून सुरू होणारा पाचवा आणि अखेरचा सामना होणार की नाही, याबाबत सशांकता आहे. यादरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सौरव गांगुली यांनी सांगितलं की, इंग्लंडविरुद्ध उद्या शुक्रवारपासून सुरू होणारा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना होणार की नाही, याविषयी अद्याप अनिश्चितता आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर सपोर्ट स्टाफमधील आणखी एक सदस्य बाधित आढळला. यामुळे आज गुरूवारी भारतीय संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले.
सौरव गांगुली यांच्या हस्ते कोलकातामध्ये 'मिशन डोमिनेशन' या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना गांगुली म्हणाले की, आम्ही यावेळी निश्चित सांगू शकत नाही की, सामना होणार की नाही. पण आशा आहे की सामना होईल.
फिजिओ योगेश परमार यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. अद्याप खेळाडूंचा रिपोर्ट आलेला नाही.
दरम्यान, योगेश परमार पॉझिटिव्ह झाल्यानंतर संघाकडे आता एकही फिजिओ नाही. रवी शास्त्री कोरोना बाधीत आढळल्यानंतर मुख्य फिजिओ नितिन पटेल क्वारंटाईनमध्ये आहेत. अशा स्थितीत बीसीसीआयने ईसीबीच्या फिजिओना सेवा देण्याची विनंती केली आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं की, खेळाडूंच्या आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल येणार आहेत. यावर सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल. तो पर्यंत खेळाडूंना हॉटेलमध्ये राहण्यास सांगितलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. उभय संघातील ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
हेही वाचा - युझवेंद्र चहलला टी-20 विश्वकरंडक संघातून वगळलं, पत्नी धनश्री वर्माने शेअर केली भावूक पोस्ट
हेही वाचा - T-20 World Cup: मार्गदर्शक बनल्यानंतर वादात अडकला महेंद्रसिंग धोनी, होतोय गंभीर आरोप