सिडनी - सिडनी येथे खेळलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली असली, तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका भारतीय चाहत्याचा विजय झाला. या तरुणाने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रेयसीला भर मैदानात प्रपोज केले.
ही रोमँटिक घटना अनेक कॅमेर्यात कैद झाली. भारताने सामना गमावत अनेक चाहत्यांना नाराज केले असले, तरी या भारतीय तरूणाने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भारतीयाने ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज केले. या प्रपोजनंतर संबधित मुलीनेही त्याला होकार देत मिठी मारली. तेथे उपस्थित प्रेक्षकांनी या जोडीचे कौतुक केले. शिवाय, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनेही या जोडीला दाद दिली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३९० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ ३३८ धावांपर्यंत मजल मारू शकला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कॅनबेरा येथे २ डिसेंबरला खेळवण्यात येईल.