मेलबर्न - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. जलदगती गोलंदाज उमेश यादवला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. वैयक्तिक चौथ्या षटकातील तिसरा चेंडू फेकल्यानंतर उमेशच्या पायाला दुखापत झाली.
हेही वाचा - ग्लोब सॉकर पुरस्कार : रोनाल्डो ठरला शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू
दुसऱ्या डावातील आठवे षटक टाकत असताना उमेशला हॅमस्ट्रिंगमुळे मैदान सोडवे लागले. उमेश यादवचे उर्वरीत षटक मोहम्मद सिराजने पूर्ण केले. सलामीवीर फलंदाज जो बर्न्सला बाद करत उमेशने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, अचानक त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास होऊ लागला.
बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार, उमेशने चौथ्या षटकात फेकताना हॅमस्ट्रिंग दुखापतीची तक्रार केली. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आहे. आता त्याचे स्कॅन केले जाईल. उमेश मैदानावर उतरला नाही तर तो भारतासाठी मोठा धक्का ठरणार आहे. कारण मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.