मेलबर्न - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व खेळाडू सुनील गावसकर यांनी अजिंक्य रहाणेची स्तुती केली आहे. रहाणेला जेव्हा कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने उत्तमपणे आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावण्याची चांगली समज आहे, असे गावसकर म्हणाले.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिका सुरू आहे. काल(शनिवार)पासून बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाची धुरा आहे. काल सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. त्यात क्षेत्ररक्षणाची मोठी भूमिका होती. गावसकर म्हणाले, 'रहाणेला क्षेत्ररक्षण लावण्याची समज आहे. क्षेत्ररक्षणाप्रमाणे गोलंदाजी केली तर, लवकर विकेट मिळतात. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी असेच केले.'
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने मिळून सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. अश्विन, बुमराह आणि सिराज या तिघांचा कर्णधार रहाणेने अतिशय चांगला उपयोग करून घेतला, असे गावसकर म्हणाले. मी आणि रहाणे दोघेही मुंबईचे असल्याने, कदाचित मी जास्त स्तुती करत असल्याचा आरोप केला जाईल, असेही ते म्हणाले.