ब्रिसबेन - बॉर्डर-गावसकर मालिकेची चौथी आणि अंतिम कसोटी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लायनच्या कसोटी कारकीर्दीचा हा १००वा सामना आहे. या विशेष कसोटीनिमित्त लायनच्या सहकारी खेळाडूंनी त्याला सामना सुरू होण्यापूर्वी 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. नाथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कसोटी फिरकीपटू मानला जातो.
नाथन लायनने आतापर्यंत ३९६ कसोटी बळी घेतले आहेत. १०० कसोटी खेळणारा लायन ऑस्ट्रेलियाचा १३वा क्रिकेटपटू आहे. २०११मध्ये श्रीलंकेविरूद्ध त्याने गॉल येथे पदार्पण केले होते. पहिल्याच चेंडूवर त्याने कुमार संगकाराला बाद केले. एवढेच नव्हे तर त्याने त्या सामन्यात पाच बळीही घेतले.
नाथन लायनने १८ वेळा पाच बळी घेण्याची किमया केली आहे. ५० धावांत ८ बळी ही लायनची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २९ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये त्याने १०० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. जून २०१५ मध्ये त्याने ह्यू ट्रंबचा १४२ बळींचा विक्रम मोडत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी ऑफस्पिनर होण्याचा मान पटकावला.