बिस्बेन : वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकुर या भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे घामटे काढत १२३ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताला तीनशे धावांचा आकडा गाठता आला. या डावात ऑस्ट्रेलियासाठी पाच बळी घेणाऱ्या जोश हेझलवुडने वॉशिंग्टन-शार्दुलचे कौतुक केले आहे. या कौतुकासोबतच त्याने कबूल केले की, भारताच्या शेपटाकडच्या फलंदाजांना बाद करण्याची रणनीती अयशस्वी ठरली. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना खेळवण्यात येत आहे.
हेही वाचा - शार्दुल ठाकुरच्या कामगिरीनंतर विराटचे मराठी ट्विट व्हायरल!
हेझलवुड सामन्यानंतर म्हणाला, ''जेव्हा भारताचे ६ फलंदाज २०० धावांत गुंडाळले गेले, तेव्हा आम्ही वरचढ असल्याचा विचार केला. पण खरे सांगायचे तर या दोघांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली. आम्ही त्यावेळी आमच्या योजनेचे पालन करू शकलो नाही. आम्हाला काही संधी मिळाल्या. मला आशा आहे की, या संधींचा आपण पुढे उपयोग करू शकू. पण शार्दुल आणि वॉशिंग्टन या दोघांनाही श्रेय जाते. त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजीमुळे खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे दिसते.'' हेझलवुडने या डावात ५७ धावा देत ५ बळी घेतले.
पहिल्या डावात भारताचे आघाडीचे ६ फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले. तेव्हा भारतीय संघ १८३ धावांनी पिछाडीवर होता. अशा कठीण स्थितीत मराठमोळा शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी रचली. याच भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. शार्दुलने ११५ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. तर, सुंदरने १४४ चेंडूचा सामना करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारली.