अॅडलेड - बॉर्डर-गावसकर मालिकेतील गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना सर्वांच्याच लक्षात राहिला. क्रिकेटमध्ये बलाढ्य अशा भारतीय संघाला हेझलवूड-कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नेस्तनाबूत केले. भारताचा संघ दुसऱ्या डावात नामुष्कीजनक ३६ धावाच करू शकला. कसोटी कारकिर्दीतील भारतीय संघाची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. यासोबतच १९ डिसेंबर ही तारीखही खास भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खास ठरली.
हेही वाचा - अर्जेंटिनामधील स्टेडियमला मॅराडोना यांचे नाव
१९ डिसेंबरलाच भारताने रचली होती सर्वोच्च धावसंख्या -
चार वर्षांपूर्वी १९ डिसेंबर या तारखेला भारताने आत्तापर्यंतची आपली सर्वोच्च कसोटी धावसंख्या नोंदवली होती. २०१६ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारताने ७ बाद ७५९ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. भारताकडून करुण नायरने ३०३ धावांची अप्रतिम खेळी करत, कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा दुसरा भारतीय होण्याचा मान मिळवला. केएल राहुल १९९ धावांवर बाद झाला होता. विराट कोहली त्यावेळी कर्णधार होता.
कसोटीत भारताची निचांकी धावसंख्या -
१९ डिसेंबर २०२० बरोब्बर चार वर्षांनी भारतीय संघाच्या नावे निचांकी धावसंख्येचा विक्रम नोंदला गेला. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ५ आणि ४ बळी मिळवले. ही
यापूर्वी भारताची सर्वात कमी धावसंख्या ४२ धावा अशी होती. इंग्लंडविरुद्ध १९७४ मध्ये लॉर्ड्स येथे ही खराब कामगिरी नोंदवली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. १९५५साली ऑकलंडमध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध २६ धावा केल्या होत्या.