ब्रिस्बेन - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्रानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अखेर तिसरे सत्र न खेळवताच दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. भारताच्या २ बाद ६२ धावा असताना ब्रिस्बेनमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झाली असून भारत अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे २ तर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर खेळत होते.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात गुंडाळल्यानंतर भारताने आपल्या डावाला सुरुवात केली. सलामीर शुबमन गिल अवघ्या ७ धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सच्या अप्रतिम चेंडूवर शुबमनला झेलबाद व्हावे लागले. त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने संयमी खेळ केला. रोहित मोठी खेळी करणार असे वाटत असताना ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर नाथन लायनने त्याला ४५ धावांवर झेलबाद केले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला आहे. आज दुसऱ्या दिवशी यजमान संघाने ५ बाद २७४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शंभरपेक्षा कमी धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाचे उर्वरित फलंदाज बाद झाले. भारताकडून शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला.
काल दिवसअखेर नाबाद राहिलेले टिम पेन आणि कॅमेरून ग्रीन आज चांगल्या लयीत खेळत होते. मात्र, शार्दुलने पेनचा काटा काढत ही जोडी फोडली. पेनने ६ चौकारांसह अर्धशतक झळकावले. तर, सुंदरने ग्रीनचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. ग्रीनने ४७ धावा केल्या. भारत ऑस्ट्रेलियाला लवकर गुंडाळत असे वाटत होते. मात्र, मिचेल स्टार्क आणि आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या नाथन लायनने शेवटी झुंज दिली. स्टार्कने २० तर लायनने २४ धावांचे योगदान दिले. हे दोघे बाद झाल्यानंतर नटराजनने हेझलवुडचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात लाबुशेनचे शतक -
या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भरवशाचा फलंदाज मार्नस लाबुशेनने शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस ही यजमान संघाची सलामी जोडी 'फ्लॉप' ठरली. पहिल्या षटकात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. वॉर्नर एका धावेवर असताना सिराजने त्याला स्लिपमध्ये असलेल्या रोहित र्शमाकडे झेल देण्यास भाग पाडले. तर, शार्दुल ठाकुरने मार्कस हॅरिसला बाद करत यजमान संघाला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मात्र, लाबुशेन-स्मिथ जोडीने संघाला सावरले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
पदार्पण केलेल्या सुंदरने स्मिथला झेलबाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. स्मिथ ३६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडने ४५ धावा करत लाबुशेनला उत्तम साथ दिली. वेडने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. भारताचा दुसरा पदार्पणवीर टी. नटराजनने वेडला बाद केले. त्यानंतर लांबुशेनने आपले शतक पूर्ण करत संघाला दोनशेपार नेले. लाबुशेनने २०४ चेंडू खेळत ९ चौकारांसह १०८ धावा केल्या. नटराजनने लाबुशेनला पंतकरवी झेलबाद केले.
नटराजन-सुंदरचे पदार्पण -
या कसोटी सामन्यात भारताकडून टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. सिडनी कसोटीत दुखापत झालेले जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी या सामन्यात खेळत नसल्याने नटराजन आणि सुंदरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तर, ऑस्ट्रेलियाकडून विल पुकोव्स्की संघाबाहेर असून मार्कस हॅरिसला सामना खेळण्याची संधी मिळाली.
लायनचा १००वा कसोटी सामना -
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर नाथन लायन १०० वा कसोटी सामना खेळत आहे. ब्रिस्बेन येथे सुरू असलेला हा सामना कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला.
हेही वाचा - नेमबाजपटू सौरभ चौधरीचा विश्वविक्रम, मनु भाकरही अव्वल