मेलबर्न - बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका रंगतदार अवस्थेत आहे. अॅडलेड येथील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. तर बॉक्सिंग डे कसोटी अजिंक्यसेनेने आपल्या नावावर केली. या दोन्ही कसोटीत दोन्ही संघांचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल १३२ वर्षानंतर प्रति विकेट धावांची सरासरी कमी राहिली आहे.
हेही वाचा - विराटच्या संघाकडून खेळण्यास स्टेनचा नकार
यंदाच्या हंगामात प्रति विकेट धावांची सरासरी २१.५० अशी आहे. १८८७-८८ नंतर ही सर्वात कमी सरासरी आहे. १८८७-८८ सालात प्रति विकेट सरासरी ९.३५ अशी होती. मागील वर्षी पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. तेव्ही ही सरासरी ३४.०१ अशी होती. तर, दोन वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आला होता, तेव्हा ही सरासरी ३०.०३ अशी होती.
भारताची मालिकेत बरोबरी -
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमवत पहिल्या पराभवाचा वचपा काढला. अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या.
या विजयामुळे भारताने 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्यला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा तिसरा कसोटी सामना गुरुवारी ७ जानेवारी रोजी सिडनी मैदानावर खेळला जाईल.