मेलबर्न - पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून धूळ चारली. या विजयानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे खूप कौतुक होत आहे. भारतातून नव्हे तर, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनीही रहाणेला शाबासकी दिली. याबाबत भारताचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - AUS VS IND : पराभवावर टीम पेन म्हणाला, भारतीय संघाने आम्हाला...
गावसकर म्हणाले, "अजिंक्य संघाचे नेतृत्व करत असताना त्याचे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी केलेले कौतुक आनंददायी होते. यात रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, माइक हसी, शेन वॉर्न अशा खेळाडूंचा समावेश होता.'' या विजयामुळे भारताने बॉर्डर-गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
विराट संघात आल्यानंतर त्याने नेतृत्व हाती घेतले पाहिजे, असेही गावसकरांनी सांगितले. ते म्हणाले, "रहाणे काळजीवाहू कर्णधार आहेत. जेव्हा मुख्य खेळाडू संघात परततो तेव्हा तुम्हाला जागा मोकळी करावी लागते."
भारताची मालिकेत बरोबरी
ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघ हा पराभव विसरून नव्या दमाने, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात भारतीय संघाने तिन्ही आघाड्यावर दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत सामना जिंकला. नेतृत्वक्षमता व पहिल्या डावातील शतकी खेळीसाठी कर्णधार अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे.