अॅडलेड - विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला भारताचे कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. संघाचे नेतृत्व करताना रहाणेवर दबाव निर्माण होणार नाही, असा विश्वास महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केला. अॅडलेड येथे होणार्या पहिल्या कसोटीनंतर कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परततील.
हेही वाचा - क्रिकेटपटू ख्रिस लिन आणि डॅन लॉरेन्सची होणार चौकशी
रहाणेवर दबाव नाही -
गावसकर म्हणाले, "अजिंक्य रहाणेवर कोणताही दबाव नाही. कारण त्याने दोनदा भारताचे कर्णधारपद भूषविले होते आणि दोन्ही वेळेस तो विजयी झाला होता. त्याने धर्मशाळेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भुषवले आणि तो सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानविरुद्धही त्याच्याच नेतृत्वात भारताने दोन दिवसात सामना जिंकला होता. त्याच्यावर कर्णधारपदाचा कुठलाही दबाव असणार नाही. कारण तो जाणतो की, तो फक्त तीन सामन्यांसाठी कार्यवाहक कर्णधार आहे.''
गावसकर पुढे म्हणाले, ''रहाणेवर कर्णधारपदाचा दबाव असणार नाही. मात्र, त्याच्याकडून अपेक्षा नक्कीच आहेत. कर्णधारपदासह तो चेतेश्वर पुजारासोबत मिळून भारताच्या फलंदाजीचे नेतृत्व करेल. या दोन्ही अनुभवी खेळाडूंवर अधिक जबाबदारी राहील.''
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरू होईल. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस रात्र स्वरूपात खेळवला जाईल.