मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. वॉर्नरसोबत वेगवान गोलंदाज सीन एबॉटही या सामन्यात खेळू शकणार नाही. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले असल्याचे वृत्त आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जाईल. पहिला कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
वॉर्नर आणि एबॉट तिसऱ्या कसोटीत खेळण्याची चिन्हे -
वॉर्नर आणि एबॉट तिसऱ्या कसोटीत खेळण्याची चिन्हे आहेत. वॉर्नर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. भारताविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात ३४ वर्षीय वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो तिसऱ्या एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांच्या टी-२० मालिकेला मुकला होता. तर, गोलंदाज एबॉटला सराव सामन्यात दुखापत झाली होती.
हेही वाचा - गेलचे 'वादळ' अबुधाबी लीगमध्ये घोंगावणार!
"वॉर्नर आणि एबॉटने दुखापतीतून सावरण्यासाठी संघाच्या जैव-सुरक्षित हबच्या बाहेर सिडनीमध्ये वेळ घालवला. कोणताही खेळाडू विशिष्ट 'हॉटस्पॉट'मध्ये नव्हता, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैव-सुरक्षा प्रोटोकॉलमुळे त्यांना पुन्हा सामील होण्याची परवानगी नाही'', असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सिडनीमध्ये वाढलेल्या कोरोनाच्या प्रकरणानंतर हे दोघे मेलबर्नला गेले.
स्मिथच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह –
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला देखील पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. स्मिथने मेलबर्नला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी फिट होण्याची आशा व्यक्त केली आहे.
काही माध्यमांनुसार, उभय संघात ७ जानेवारीपासून सुरू होणारा सिडनी कसोटी सामना रद्द केला जाऊ शकतो. कोरोनाच्या कारणामुळे मेलबर्नमध्ये तिसरा सामना खेळवण्यात येईल.