वॉर्सेस्टर - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी केली. तिने अखेरपर्यंत नांगर टाकत संघाला विजय मिळवून दिला आणि भारतीय संघाला क्लिन स्विपच्या नामुष्कीपासून वाचवलं.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकात २१९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हे आव्हान ३ चेंडू आणि ४ गडी राखून पूर्ण केले. पावसामुळे हा सामना ४७ षटकाचांचा खेळवण्यात आला होता. मिताली राजने या सामन्यात ८६ चेंडूत १२ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली. तिला या खेळीमुळे सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सामना संपल्यानंतर बोलताना मिताली राज म्हणाली, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकू इच्छित होते. मी भरमैदानात कधी पराभव स्विकारू मान्य करू शकत नाही. मला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहायचे होते. कारण डगआउटमध्ये बसून सामना जिंकता येत नाही. मी संघाला विजय मिळवून देऊ इच्छित होते.
संघात युवा खेळाडू असतील तर त्यांना मार्गदर्शन करत पुढे घेऊ जावे लागते, ही अनुभवी खेळाडूची जबाबदारी असते, असेही मिताली राज म्हणाली. दरम्यान, मिताली राजने स्नेह राणा सोबत सहाव्या गड्यासाठी ५० धावांची भागिदारी केली. या भागिदारीमुळे भारतीय संघाची गळती थांबली आणि अखेरच्या षटकात मितालीने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तु महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारी फलंदाज आहेस, तुला कसं वाटतं, असा सवाल विचारल्यानंतर मिताली राजने स्मित हास्य केलं. या प्रश्नाचे उत्तर तिने फक्त तीन शब्द दिले. ती म्हणाली, आय एम जस्ट हॅपी म्हणजे मी खूश आहे.
मिताली राजच्या नावे एकाच दिवशी २ विश्वविक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात इतिहास रचला. मितालीने या सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी साकारत भारतीय महिला क्रिकेट संघाला विजय मिळवून दिला. यासह ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज बनली आहे. तसेच मिताली सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे.
हेही वाचा - WI vs SA : दक्षिण अफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर २५ धावांनी विजय, मालिका ३-२ ने जिंकली
हेही वाचा - IND vs SL : राहुल द्रविडच्या तालमीत टीम इंडियाने गिरवले क्रिकेटचे धडे, पाहा व्हिडिओ