लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगला आहे. या सामन्यातील पहिले दोन दिवस इंग्लंड संघाने गाजवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दमदार खेळ करत इंग्लंड संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. अनुभवी फलंदाज चेतश्वर पुजारा (91) आणि विराट कोहली (45) नाबाद आहेत. दुसऱ्या डावात भारत अद्यापही 139 धावांनी पिछाडीवर आहे.
के. एल. राहुल आणि रोहित या सलामीवीर जोडीने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली. दोघांनी 18 षटके खेळून काढली. परंतु उपहारापूर्वी अखेरच्या चेंडूवर के एल राहुल बाद झाला. त्याने 8 धावा केल्या. दुसऱ्या सत्रात रोहित-पुजारा यांनी सूत्रे सांभाळली. दोघांनी या सत्रात 78 धावा केल्या. या दरम्यान, रोहित शर्माने मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले.
तिसऱ्या सत्रातसुद्धा ही जोडी इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा ऑली रॉबिन्सनने रोहित शर्माला पायचित करत ही जोडी फोडली. रोहित शर्माला 59 धावांवर माघारी परतावे लागले. सात चौकार आणि 1 षटकार लगावणाऱ्या रोहितने पुजारासह दुसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी रचली. यानंतर रोहितची जागा घेण्यासाठी कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. या दोघांनी इंग्लंड गोलंदाजीचा यशस्वी सामना केला. या दरम्यान, चेतेश्वर पुजाराने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. अखेर 80 षटके पूर्ण झाल्यावर अंधूक सूर्यप्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
त्याआधी, गुरुवारी 8 बाद 423 धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना फक्त 9 धावांची भर घालता आली आणि इंग्लंडला पहिल्या डावात 354 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून मोहम्मद शमीने पहिल्या डावात सर्वाधिक चार गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
- भारत (पहिला डाव) : ऑलआउट 78
- इंग्लंड (पहिला डाव) : 132.2 षटकांत ऑलआउट 432 (जो रूट 121; मोहम्मद शमी 4/92)
- भारत (दुसरा डाव) : 80 षटकांत 2 बाद 215 (चेतेश्वर पुजारा नाबाद 91, रोहित शर्मा 59, विराट कोहली नाबाद 45; क्रेग ओवरटन 1/35)