मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकल्यानंतर आता भारताची नजर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याकडे आहे. ही मालिका आगामी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळणार आहे. तर वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला संघात स्थान मिळालेले नाही.
रोहित शर्माला विश्रांती : दुसरीकडे भारतीय संघ रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरविना मैदानात उतरणार आहे. जसप्रीत बुमराहही अद्याप दुखापतीतून सावरू शकलेला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत यशस्वी पुनरागमन करणारा शार्दुल ठाकूर पहिल्या सामन्यात खेळू शकतो. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल असे सर्व खेळाडू या मालिकेसाठी उपलब्ध आहेत.
ईशान आणि शुभमन सलामीला : सलामीवीर ईशान किशन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चट्टोग्राममध्ये बांगलादेशविरुद्ध 210 धावांची शानदार खेळी केली होती. पहिल्या सामन्यात ईशान आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील, असे कर्णधार हार्दिक पांड्याने स्पष्ट केले आहे. जखमी अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव आणि अनकॅप्ड रजत पाटीदार हे मधल्या फळीत खेळण्याची शक्यता आहे.
मॅक्सवेल आणि झाम्पाचे पुनरागमन : ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळू शकते. तर कसोटीत शानदार गोलंदाजी करणाऱ्या नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन या फिरकी गोलंदाजांना विश्रांती दिली जाऊ शकते. शेवटच्या कसोटीत 180 धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाला पहिल्या सामन्यात स्थान मिळणे अवघड आहे. त्याच्या जागी ट्रॅव्हिस हेड डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीला उतरू शकतो.
संभाव्य संघ : भारत - शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव / रजत पाटीदार, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल / वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर / कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी / उमरान मलिक. ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श / मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस.