नवी दिल्ली IND vs AFG T20 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा प्रयत्न मालिका जिंकण्याचा असेल. भारतानं पहिला सामना 6 विकेटनं जिंकला होता. या सामन्यासाठी रोहित भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करू शकतो. दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीचा प्लेइंग 11 मध्ये सहभाग होऊ शकतो.
खेळपट्टीचा अहवाल : इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. या खेळपट्टीवर वेग आणि उसळीमुळे हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. तसंच या मैदानाचं आउटफिल्डही अतिशय वेगवान असल्यामुळे येथे क्षेत्ररक्षकांना धावा रोखणं सोपं नाही. येथे गोलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड असून वेगवान गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी धडपडताना दिसतात. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते. येथे 200 धावांचा पाठलागही करता येतो. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 210 ते 220 दरम्यान आहे. येथील सर्वोच्च धावसंख्या 260 असून त्याची नोंद भारतानंच केली होती.
होळकर स्टेडियमवर भारताचा टी 20 रेकॉर्ड : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आतापर्यंत भारतीय संघ फक्त 3 सामने खेळला आहे. या मैदानावर भारतानं 2 सामने जिंकले असून 1 सामन्यात पराभव झाला आहे.
- 2017 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी 20 सामना खेळला गेला. भारतानं हा सामना 88 धावांनी जिंकला.
- 2020 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात येथे दुसरा टी 20 सामना खेळला गेला. भारतानं हा सामना 7 विकेटनं जिंकला.
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2022 मध्ये तिसरा टी 20 सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 49 धावांनी जिंकला.
होळकर स्टेडियमवर रोहितचा रेकॉर्ड : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं या मैदानावर टी 20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर त्यानं 2 सामन्यात एका शतकासह 118 धावा केल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवचं नाव आघाडीवर आहे. या मैदानावर त्यानं 5 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियानं येथे सर्व फॉरमॅटमध्ये 13 सामने खेळले, ज्यामध्ये 11 सामने जिंकले आणि 2 सामने गमावले.
हे वाचलंत का :