नवी दिल्ली Delhi Air Pollution : राजधानी नवी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाचा फटका सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकालाही बसला आहे. शुक्रवारी बांग्लादेश क्रिकेट टीमनं त्यांचं सराव सत्र रद्द केलं.
खेळाडूंना वायू प्रदूषणापासून वाचवण्यासाठी उपाय : बांग्लादेश संघाचे संचालक खालेद महमूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना वायू प्रदूषणापासून वाचवण्यासाठी शुक्रवारी कोटला येथील सराव सत्र रद्द केलं. एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडलेला बांग्लादेशचा संघ बुधवारीच नवी दिल्लीत दाखल झाला होता. ६ नोव्हेंबरला ते दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सामना खेळणार आहेत.
नायब राज्यपालांनी तातडीची बैठक बोलावली : नवी दिल्लीच्या वायु गुणवत्ता निर्देशांकानं (AQI) शुक्रवारी ४५० चा टप्पा ओलांडला. यानंतर केंद्राच्या ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे आपत्कालीन उपाय सुरू करण्यात आले. याचा उद्देश खराब हवेच्या गुणवत्तेत आणखी बिघाड रोखणे हा आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील परिस्थिती सतत बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी शुक्रवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला पर्यावरण मंत्री गोपाल राय हजर होते.
घराबाहेर न पडण्याचं आवाहन : गोपाल राय यांनी दिल्लीतील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय संपूर्ण दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी शिंपडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नायब राज्यपालांनी देखील मुलं आणि वृद्धांना घरात राहण्याचं आवाहन केलं. दिल्लीतील काही भागात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ८०० च्या पुढे गेल्यानं त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता नायब राज्यपालांनी शुक्रवारीचे त्यांचे सार्वजनिक कार्यक्रमही रद्द केले होते.
हेही वाचा :