अहमदाबाद Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकातील ४२ वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या पराभवासह अफगाणिस्तान स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे.
उमरझाईची एकाकी झुंज : अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं शानदार फलंदाजी केला. त्याचं शतक केवळ ३ धावांनी राहिलं. तो १०७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीनं ९७ धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानचे इतर फलंदाज मात्र काही कमाल करू शकले नाही. नूर अहमदनं ३२ चेंडूत २६ धावा केल्या, तर रहमत शाहनं ४६ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून गीराल्ड कोएट्जीनं शानदार गोलंदाजी करत ४४ धावा देऊन ४ गडी बाद केले.
लक्ष्य सहज गाठलं : अफगाणिस्ताननं दिलेलं २४५ धावांचं लक्ष्य फार्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेनं मोठ्या आरामात गाठलं. रॅसी व्हॅन डर डुसेन ९५ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा करून नाबाद राहिला, तर डी कॉकनं ४७ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. फेहल्यूकवायोनं ३७ चेंडूत नाबाद ३९ धावांचं योगदान दिलं. आफ्रिकेनं ४७.३ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २४७ धावा करून शानदार विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी आणि राशिद खाननं प्रत्येकी २-२ बळी घेतले. रॅसी व्हॅन डर डुसेनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), टेम्बा बवुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ऍंडिले फेहल्यूकवायो, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, गीराल्ड कोएट्जी
- अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 SA vs AFG : आफ्रिकेची फलंदाजी आणि अफगाणच्या फिरकीमध्ये अहमदाबादेत रंगणार 'युद्ध'
- Cricket World Cup 2023 NZ vs SL : सामना न्यूझीलंड-श्रीलंकेचा, मात्र पाऊस ठरु शकतो पाकिस्तानसाठी 'तारणहार', नेमकं समीकरण काय?
- Cricket World Cup 2023 AUS vs AFG : अदभूत, अविश्वसनीय! 'संकटमोचक' मॅक्सवेलनं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम