मुंबई Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केलीय. या उत्कृष्ट कामगिरीमुळं त्यांनी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केलीय.
भारतीय संघ अपराजीत : भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. भारतीय संघानं त्यातीत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं संघाचे 7 विजयांसह 14 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. गुरुवारचा सामना जिंकत भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. आता संघासमोर बाद फेरीत विजयाची नोंद करण्याचं आव्हान असणार आहे.
उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश : भारतीय संघानं विश्वचषकातील 33 व्या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम खेळताना 357 धावा केल्या होत्या. 358 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकांत अवघ्या 55 धावांत गडगडला आणि 302 धावांनी सामना गमावला. यासह भारतीय संघानं उपांत्य फेरीत धडक मारलीय.
विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास :
- भारतीय संघानं पहिल्या सामन्यात पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटनं पराभव केला होता. ऑस्ट्रेलियानं भारताला 200 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान विराट कोहली (85) आणि के एल राहुल (97) यांनी मिळून पूर्ण केलं होतं.
- दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 8 विकेटने दणदणीत पराभव केला होता. अफगाणिस्ताननं भारताला 273 धावांचं लक्ष्य दिलं होतं. याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (131) आणि विराट कोहली (55) यांनी संघाला विजयापर्यंत नेलं होतं.
- भारतीय संघानं तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 विकेट्सनं विजय मिळवला होता. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कर्णधार रोहित शर्मा (86) आणि श्रेयस अय्यर (53) यांच्या खेळीनं भारताला सहज विजय मिळाला होता.
- विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारतीय संघानं शेजारी बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला. भारतासमोर बांगलादेशकडून 257 धावांचं लक्ष्य होतं. ते विराट कोहली (103) आणि शुभमन गिल (53) यांनी संयुक्तपणे पूर्ण केलं होतं.
- न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं 4 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात भारताला न्यूझीलंडनं 274 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान विराट कोहली (95) आणि रोहित शर्मा (46) यांच्या बळावर पूर्ण केलं.
- सहाव्या सामन्यात भारतानं गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा (87) आणि सूर्यकुमार यादव (49) यांच्यामुळं भारतानं इंग्लंडला 230 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र मोहम्मद शमी आणि भारतीय संघाच्या धारदार गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ अवघ्या 129 धावांत गारद झाला.
- भारताचा सातवा सामना वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध होता. भारतानं हा सामना तब्बल 302 धावांनी जिंकला. या सामन्यात शुभमन गिल (92), विराट कोहली (88) आणि श्रेयस अय्यर (82) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं श्रीलंकेला 358 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद शमीच्या 5 विकेट्स आणि मोहम्मद सिराजच्या 3 विकेट्समुळं श्रीलंकेचा अवघ्या 55 धावांत खुर्दा उडाला. यासह भारतानं विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात दणक्यात प्रवेश केला.
हेही वाचा :
- Surendra Nayak Exclusive Interview : भारतीय संघासाठी रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी - माजी क्रिकेटपटू सुरेंद्र नायक
- Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला दुष्काळात तेरावा महिना! ग्लेन मॅक्सवेल नंतर 'हा' स्फोटक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून 'आऊट'
- 7 Records in NZ vs SA Match : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका सामन्यात आफ्रिकेनं केले 'हे' सात विक्रम