हैदराबाद Cricket World Cup 2023 : अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या २०१ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर मंगळवारी ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयासह कांगारुंनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. आतापर्यंत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरशीची लढाई आहे.
गुणतालिकेची स्थिती : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सर्वप्रथम उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. मेन इन ब्लू ८ सामन्यांमध्ये १६ गुण घेऊन गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दुसऱ्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ सध्या + ०.०३६ च्या नेट रन रेटसह ८ सामन्यांमध्ये ४ विजय मिळवत पाचव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड + ०.३९८ च्या रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचेही पाकिस्तान आणि न्यूझीलंड प्रमाणेच ८ गुण आहेत. मात्र रन रेटमुळे (-०.३३०) ते पाचव्या स्थानी आहेत.
उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान लढत कशी :
परिस्थिती १ : १५ नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता अजूनही कायम आहे. हे घडण्यासाठी बाबर अँड कंपनीला कोलकातामध्ये गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं भविष्य ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेच्या अखेरच्या साखळी सामन्यावर अवलंबून आहे. जर श्रीलंकेनं या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आणि पाकिस्ताननं इंग्लंडला पराभूत केलं, तर ते १० गुणांपर्यंत पोहचू शकतात. याशिवाय, पाकिस्तानला पुढे जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला पराभूत करणं आवश्यक आहे. मात्र, अफगाणिस्तान जिंकल्यास पाकिस्तानचं भवितव्य रन रेटवर अवलंबून असेल.
परिस्थिती २ : पाकिस्तानसाठी ही परिस्थिती खूपच कठीण आहे. तिन्ही संघांमध्ये न्यूझीलंडचा रन रेट सर्वाधिक (०.३९८) आहे. अशा वेळी, जर न्यूझीलंड फक्त १ धावांनी जिंकला तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी इंग्लंडला १३० किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकानं पराभूत करावं लागेल. पुन्हा या परिस्थितीत अफगाणिस्तानचा धोका कायम राहील. पाकिस्तानला पुढे जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव करणं गरजेचं आहे.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानची परिस्थिती : गेल्या दोन विश्वचषकाचा उपविजेता न्यूझीलंड गुरुवारी बंगळुरू येथे त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे. किवींना हा सामना मोठ्या फरकानं जिंकणं आवश्यक आहे. आणि त्यांना आशा करावी लागेल की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्यांचे अखेरचे सामने जिंकणार नाहीत. अफगाणिस्तानला चौथा संघ म्हणून पात्र होण्यासाठी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. मात्र जर न्यूझीलंड आणि पाकिस्तान अनुक्रमे श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध पराभूत झाले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ विजय अफगाणिस्तानसाठी पुरेसा आहे.
हेही वाचा :