कोलकाता Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ४४ वा साखळी सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून ३३७ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ ४३.३ षटकात २४४ धावांवर ऑलआऊट झाला.
इंग्लंडची दमदार फलंदाजी : इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लडचे सलामीवीर डेव्हिड मलान आणि जॉनी बेयरस्टो यांनी ८२ धावांची दमदार भागिदारी केली. मलान ३१ धावा करून बाद झाला, तर बेयरस्टोनं ५९ धावांचं योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रूट आज फॉर्ममध्ये दिसला. त्यानं ७२ चेंडूत ६० धावा ठोकल्या. तर बेन स्टोक्सनं ७६ चेंडूत ८४ रन्स मारले. अखेरच्या षटकात हॅरी ब्रूकनं १७ चेंडूत ३० धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे इंग्लंडनं निर्धारित ५० षटकात ९ विकेट गमावून ३३७ धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफनं ६४ धावा देऊन ३ बळी घेतले.
पाकिस्तानची शरणागती : इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. अब्दुल्ला शफीक दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तर फखर जमान ९ चेंडूत १ धाव करून परतला. कर्णधार बाबर आझमनं थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ४५ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. रिझवाननं ५१ चेंडूत ३६ धावा केल्या. पाकिस्तानकडून केवळ आगा सलमान अर्धशतक झळकावू शकला. त्यानं ४५ चेंडूत ५१ धावा केल्या. पाकिस्तानची टीम ४३.३ षटकात २४४ धावा करून ऑलआऊट झाली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीनं ५६ धावा देऊन ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय :
- पाकिस्तान : फखर जमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ
- इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार/ यष्टिरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, गॅस ऍटकिन्सन
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर
- Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनं जिंकला ऑक्टोबर 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार
- Cricket World Cup 2023 : किवींच्या विजयानं पाकिस्तानचं विश्वचषकात 'पॅकअप', उपांत्य फेरीसाठी करावा लागेल चमत्कार; इंग्लंडनं प्रथम फलंदाजी केल्यास 'खेळ खल्लास'