नवी दिल्ली : आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवला जात आहे. टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या सामन्यात युएईचा 122 धावांच्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 3 गडी गमावून 219 धावा केल्या. 18 वर्षीय शेफाली वर्माने 34 चेंडूत 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर श्वेता सेहरावतने 49 चेंडूत 74 धावांची खेळी केली. दोघींमध्ये 111 धावांची भागीदारी झाली. या आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही या दोघींच्या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजांना नाकी नऊ आणले होते.
शेफाली-श्वेता जोडीची कमाल : 16 जानेवारी रोजी भारताने युएई संघासोबत अंडर-19 महिला T20 विश्वचषकातील दुसरा सामना खेळला. सामन्यात शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावतने पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. या सामन्यात शेफालीने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ती 34 चेंडूत 78 धावा करून बाद झाली. या खेळीत तीने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 229.41 होता. कर्णधार शेफाली वर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी श्वेताने 49 चेंडूत 74 धावा केल्या. तिने 151.02 च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार मारले.
भारताची विजयी सुरवात : अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात शेफाली वर्माने 16 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत तिच्या बॅटमधून 9 चौकार आणि 1 षटकार आला होता. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 281.25 होता. तर श्वेता सेहरावतने 57 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. श्वेताने 20 चौकार मारले. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 161.40 होता. भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकत विजयी सुरुवात केली.
गोलंदाजीतही शेफालीचा करिष्मा : शेफाली वर्माचा केवळ बॅटनेच नाही तर गोलंदाजीतही करिष्मा चालू आहे. युएई सोबत खेळलेल्या सामन्यात शेफालीने 2 षटकात 7 धावा दिल्या. या दरम्यान तिचा इकॉनॉमी रेट 3.50 होता. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिने 4 षटकात 31 धावा देत 2 बळी घेतले होते. या दरम्यान तिचा इकॉनॉमी रेट 7.75 होता. हरियाणातील 18 वर्षीय शेफालीचा 28 जानेवारीला वाढदिवस आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जानेवारीला आहे. अशा परिस्थितीत शेफाली तिच्या जबरदस्त कामगिरीचे रुपांतर विश्वचषकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या भेटीत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
हेही वाचा : ICC Womens Under 19 T20 World Cup : भारताची विजयी सुरुवात, द. आफ्रिकेवर सात गड्यांनी विजय